सोलापूर : प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमतेला बळकटी देण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषदेने एकाच विभागात सलग पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विभागीय बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या आदेशानंतर वर्ग तीन व वर्ग चार मिळून एकूण ४९ कर्मचाऱ्यांना नवीन विभागांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.
दीर्घकाळ एकाच विभागात कार्यरत राहिल्यामुळे कामकाजात एकसुरीपणा येऊ नये, तसेच विविध विभागांमध्ये अनुभवी मनुष्यबळाचा प्रभावी वापर व्हावा, या दृष्टीने ही नियमित प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात आली आहे. बदल्यांमुळे विविध विभागांतील कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रक्रियेत वर्ग चारमधील १९ आणि वर्ग तीनमधील ३० कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. विभागनिहाय पाहता सामान्य प्रशासन विभागातील सर्वाधिक १६ कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. त्याखालोखाल परिचर संवर्गातील १९, अर्थ विभागातील ६, बांधकाम विभागातील ५, आरोग्य विभागातील २ आणि कृषी विभागातील १ कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेळोवेळी रोटेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्यात येते. यामुळे कर्मचाऱ्यांना विविध विभागांचा अनुभव मिळण्याबरोबरच प्रशासनातील पारदर्शकता टिकून राहण्यास मदत होते. तसेच विभागांमधील मनुष्यबळाचा समतोल राखून सेवा अधिक प्रभावीपणे देणे शक्य होते.
प्रशासकीय दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी ही बदली प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून संबंधित कर्मचाऱ्यांना नवीन विभागात रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आगामी काळात नव्या जबाबदाऱ्यांमुळे विभागीय कामकाज अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केली आहे.
















