सोलापूर : जुळे सोलापूर परिसरातील आरटीओजवळ महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक नाट्यगृहाच्या प्रकल्पाला लवकरच गती मिळणार आहे. राज्य शासनाने प्रस्तावातील काही त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचनांसह तो महापालिकेकडे परत पाठविला होता. आता जागेची मालकी, सातबारा उतारा, जागेचे नाव आणि अन्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सुधारित प्रस्ताव पुन्हा शासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.
या प्रकल्पासाठी जुळे सोलापूर परिसरात सुमारे दोन एकर जागेवर अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन प्रस्तावित आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली होती. आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नाट्यगृह अधिक भव्य, प्रशस्त आणि अत्याधुनिक करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
प्रारंभी ५०० आसन क्षमतेचे नाट्यगृह प्रस्तावित होते. मात्र वाढती गरज लक्षात घेऊन आसन क्षमता ७५० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाट्यगृहात अत्याधुनिक ध्वनी व प्रकाशयोजना, सौरऊर्जा प्रकल्प, प्रशस्त वाहनतळ, व्यावसायिक गाळे, कलाकारांसाठी स्वतंत्र मेकअप रूम, सराव कक्ष आणि अन्य आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जुळे सोलापूर आणि हद्दवाढ भागातील सांस्कृतिक उपक्रमांसाठी सुसज्ज नाट्यगृहाची अनेक वर्षांपासून मागणी होती. त्यामुळे या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर परिसरातील सांस्कृतिक चळवळीला नवे व्यासपीठ मिळणार आहे.
Post Views: 34