सोलापूर : शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाची क्षमता वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजनेच्या कामाला निधीअभावी ब्रेक लागला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या या ४३३ कोटी ६७ लाख रुपयांच्या प्रकल्पात आतापर्यंत २०७.५ किलोमीटरपैकी १५४ किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ५३.५ किलोमीटरचे काम निधीअभावी रखडले आहे.
शहरासह हद्दवाढ भागातील नागरिकांना आधुनिक सांडपाणी व्यवस्थापनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. प्रकल्पासाठी ३४३ कोटी ६७ लाख रुपयांच्या प्रत्यक्ष कामास मंजुरी देण्यात आली असून, शहरभर भुयारी गटारांचे जाळे उभारण्याचे काम सुरू आहे. या योजनेमुळे सांडपाण्याची प्रभावी विल्हेवाट लागण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही मोठा फायदा होणार आहे.
गेल्या सुमारे ६५० दिवसांत १५४ किलोमीटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, महापालिकेच्या आर्थिक वाट्याचा निधी उपलब्ध न झाल्याने अनेक भागांतील कामे थांबली असून, काही ठिकाणी कामाचा वेगही मंदावला आहे.
या प्रकल्पासाठी २४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, ११ ऑक्टोबर २०२६ ही अंतिम मुदत आहे. उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. निधी मिळाल्यानंतर काम पुन्हा वेगाने सुरू होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. योजनेचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून, भविष्यातील नागरी विकासालाही गती मिळणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
भुयारी गटार योजनेवर दृष्टिक्षेप
– प्रकल्पाची किंमत : ४३३.६७ कोटी रुपये, प्रत्यक्ष कामासाठी ३४३.६७ कोटी मंजूर.
– एकूण काम : २०७.५ किमी पाइपलाइनपैकी १५४ किमी पूर्ण, ५३.५ किमी बाकी.
– अडचण : निधीअभावी अनेक ठिकाणी कामे ठप्प, काही ठिकाणी कामाचा वेग मंद.
– मुदत : ११ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य.
Post Views: 10