सोलापूर : उच्च शिक्षणातील गुणवत्ता, संशोधन संस्कृती, कौशल्य विकास, उद्योगाभिमुख शिक्षण आणि विद्यार्थी-प्राध्यापकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर (स्वायत्त) आणि एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव, सोलापूर यांच्यात सामंजस्य करार (Memorandum of Understanding – MoU) करण्यात आला आहे.
संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. रुतुराज बुवा आणि एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शंकर नवले यांनी या करारावर स्वाक्षऱ्या करून दोन्ही संस्थांमधील शैक्षणिक सहकार्याला औपचारिक स्वरूप दिले. यावेळी संगमेश्वर महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागाचे डॉ. प्रतापसिंह गोरेपाटील, प्रा. डॉ. आरती दिवटे तसेच सिंहगड सीआरटीडीचे संशोधन संचालक प्रा. एस एच पवार, सिंहगड महाविद्यालयाचे प्रतिनिधी डॉ. किरण एस. पाटील उपस्थित होते.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून दोन्ही संस्था शैक्षणिक, संशोधन, तांत्रिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात परस्पर सहकार्य करणार आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाशी जोडण्यासाठी संयुक्त उपक्रम राबविण्यात येणार असून ज्ञान, अनुभव आणि संसाधनांची देवाणघेवाण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
करारानुसार दोन्ही संस्था संयुक्त अध्यापन, अभ्यासक्रम विकास, तज्ज्ञांची व्याख्याने, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, परिषद, परिसंवाद, वेबिनार, तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच कौशल्यवर्धन उपक्रमांचे आयोजन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच रोजगारक्षमतेत वाढ, संवादकौशल्य, तांत्रिक प्रावीण्य आणि उद्योगस्नेही कौशल्ये विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
संशोधन क्षेत्रातही हा करार महत्त्वपूर्ण ठरणार असून संयुक्त संशोधन प्रकल्प, संशोधन लेखांचे प्रकाशन, पेटंट, नवोपक्रम, स्टार्टअप उपक्रम, सल्लागार सेवा आणि बहुविषयक संशोधनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. दोन्ही संस्थांमधील प्रयोगशाळा, ग्रंथालये, संशोधन सुविधा आणि शैक्षणिक संसाधनांचा परस्पर वापर संस्थात्मक नियमांनुसार विद्यार्थी व प्राध्यापकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाशी जोडण्यासाठी इंटर्नशिप, औद्योगिक भेटी, प्रकल्प मार्गदर्शन, प्रत्यक्ष प्रशिक्षण तसेच करिअर समुपदेशन, ॲप्टिट्यूड प्रशिक्षण, रेझ्युमे लेखन कार्यशाळा आणि मॉक इंटरव्ह्यू यांसारखे उपक्रम संयुक्तपणे राबविण्यात येणार आहेत. तसेच कॅम्पस प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही संस्था आवश्यकतेनुसार परस्पर सहकार्य करणार आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) लक्षात घेऊन परिणामाधिष्ठित शिक्षण (Outcome Based Education), अनुभवाधारित शिक्षण (Experiential Learning), अभ्यासक्रम समृद्धी, उद्योगाभिमुख विषयांचा समावेश आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचा प्रसार करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यात येणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजना (NSS), पर्यावरण जनजागृती, सामाजिक उत्तरदायित्व, शाश्वत विकास, समुदायाभिमुख उपक्रम, शैक्षणिक स्पर्धा, परिषद, परिसंवाद आणि विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे.
या सामंजस्य करारामुळे दोन्ही संस्थांतील विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांना शैक्षणिक, संशोधन, कौशल्य विकास, उद्योग सहकार्य आणि रोजगाराच्या अधिक व्यापक संधी उपलब्ध होणार असून सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Post Views: 23