जालना : ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत भारताचे माननीय पंतप्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी व्हर्च्युअल संवाद कार्यक्रमाचे आयोजन जालना येथील शासकीय रुग्णालय परिसरातील नर्सिंग महाविद्यालयात उत्साहात करण्यात आले.
मेरा युवा भारत (माय भारत), जालना तसेच युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांनी नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर माननीय पंतप्रधानांच्या व्हर्च्युअल संवादाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून पंतप्रधानांनी युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम व जबाबदार नागरिक म्हणून विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले. त्यांनी नशामुक्त भारताच्या संकल्पनेचा संदेश देत युवकांना सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.
यावेळी जनविकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मनोहर सरोदे, नर्सिंग महाविद्यालयाचे पाठ्यनिर्देशक पराग जोशी, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) चे ज्ञानेश्वर सावरकर, युवा बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड, नर्सिंग महाविद्यालयाचे चंद्रकांत मुंढे तसेच ब्रह्मकुमारी शीतल दीदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारोपप्रसंगी विद्यार्थिनी मृण्मयी सरकटे, आकांक्षा वरकड, पल्लवी सुरुसे, वैष्णवी गवळी तसेच विद्यार्थी सागर पांढरे, रोहित मगर आणि श्रीकांत पवार यांनी नशामुक्त भारताच्या संकल्पनेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, स्वयंसेवक उत्स्फूर्त प्रतिसाद देत नशामुक्त भारताच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शविला.





















