सोलापूर – राज्य शासनाने अनुकंपा नियुक्तीबाबत जुलै २०२५ मध्ये लागू केलेल्या नव्या सर्वसमावेशक धोरणामुळे जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीत नियुक्त झालेल्या ८३ उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. शैक्षणिक पात्रता असूनही रिक्त जागा नसल्यामुळे ‘गट ड’ (परिचर/शिपाई) पदावर नियुक्ती मिळालेल्या या उमेदवारांना पुढे ‘गट क’मध्ये समायोजन मिळणार नसल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केल्याने त्यांना शिपाई पदावरच सेवा सुरू ठेवावी लागणार आहे.
यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार रिक्त जागा उपलब्ध झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांचे ‘गट ड’ मधून ‘गट क’मध्ये समायोजन होण्याची अपेक्षा होती. मात्र १७ जुलै २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या नव्या शासन निर्णयाने यापूर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित केल्याने ही शक्यता संपुष्टात आली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेने विभागीय आयुक्त, पुणे यांच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाकडे मागविलेल्या मार्गदर्शनाला २२ जून २०२६ रोजी उत्तर प्राप्त झाले असून त्यात समायोजनाची तरतूद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
२०२५ मध्ये जिल्हा परिषदेत दोन टप्प्यांत अनुकंपा भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत एकूण १६८ उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यात आले. मात्र ‘गट क’च्या जागा उपलब्ध नसल्याने २४ जुलै २०२५ रोजी ४० आणि २५ सप्टेंबर २०२५ रोजी ४३ अशा एकूण ८३ पात्र उमेदवारांना परिचर पदावर नियुक्ती द्यावी लागली.
या भरती प्रक्रियेत चौथी उत्तीर्ण ते अभियांत्रिकी, पदव्युत्तर, बी. फार्मसीसारख्या उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना एकाच पदासाठी अर्ज करावा लागला. शैक्षणिक पात्रता असूनही रिक्त पदांचा अभाव असल्याने अनेक उच्चशिक्षित तरुणांनी शिपाई म्हणून सेवेत प्रवेश केला. त्यापैकी ४६ उमेदवारांनी शंभर रुपयांच्या बॉण्डवर परिचर पद स्वीकारण्याचा विकल्पही दिला होता.
चौकट
तरच पदोन्नतीची संधी
नव्या धोरणामुळे आता ‘गट ड’मधून ‘गट क’मध्ये थेट समायोजनाचा मार्ग बंद झाला असून संबंधित कर्मचाऱ्यांसाठी सेवेतील पदोन्नती हाच पुढील पर्याय उरला आहे. नियमानुसार आवश्यक सेवा पूर्ण केल्यानंतरच त्यांना पदोन्नतीची संधी मिळू शकते.
चौकट
शासनाने स्वतंत्र धोरण आखण्याची मागणी
या निर्णयामुळे अनुकंपा भरतीतील उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा योग्य वापर होण्यासाठी शासनाने स्वतंत्र धोरण आखावे, अशी मागणी कर्मचारी वर्तुळातून पुढे येत आहे.