सोलापूर – ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांच्या बांधकामासाठी एकूण १ कोटी ४४ लाख ८९ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत ग्रामविकास विभागाने हा निधी वितरित केला असून, ग्रामीण भागातील मूलभूत प्रशासकीय सुविधांना यामुळे मोठी चालना मिळणार आहे.
अनेक ग्रामपंचायतींना आजही स्वतंत्र कार्यालय नसल्याने ग्रामस्थांना विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गरज लक्षात घेऊन शासनाने मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना प्रभावीपणे राबविली आहे. या योजनेअंतर्गत दोन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना २० लाख, तर दोन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना २५ लाखांपर्यंत निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
यंदाच्या मंजुरीत अक्कलकोट तालुक्यातील सर्वाधिक चार ग्रामपंचायतींचा समावेश असून, हिळळी, बणजगोळ, बोरेगाव आणि काझीकणबस या ग्रामपंचायतींना नव्या कार्यालयांची मंजुरी मिळाली आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली, माळशिरस तालुक्यातील कोंढारपट्टा व दहिगाव, करमाळा तालुक्यातील कुंभारगाव, माढा तालुक्यातील अकोले (बु.), उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी तसेच मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी आणि बिटले या ग्रामपंचायतींचाही लाभार्थी ग्रामपंचायतींमध्ये समावेश आहे.
कोट
नवीन ग्रामपंचायत कार्यालयांमुळे ग्रामस्थांना दाखले, कर संकलन, विविध शासकीय योजनांचे अर्ज, ग्रामसभा आणि प्रशासकीय कामकाजासाठी आधुनिक व सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कामकाजात अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता आणि गतिमानता येण्यास मदत होणार असल्याचे सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी सांगितले.