वळसंग – अक्कलकोट शहर डबरे गल्लीतले सामाजिक कार्यकर्ते विनायक स्वामी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आई प्रेमा स्वामी व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एका स्थानिक मूक-बधिर शाळेत सामाजिक बांधिलकी जपणारा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. आपल्या वाढदिवसाचा बडेजाव न करता, विनायक स्वामी यांनी या विशेष मुलांसोबत आपला आनंद साजरा केला.याप्रसंगी शाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना समोशांचे मोफत वाटप करण्यात आले. गरमागरम आणि स्वादिष्ट समोसे मिळताच मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि हसू उमटले. आपल्या भावना शब्दांत व्यक्त करता येत नसले, तरी मुलांनी आपल्या बोलक्या डोळ्यांनी आणि हातांच्या खानाखुणांनी विनायक स्वामी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाबद्दल बोलताना अमोलारजे भोसले म्हणाले, “अशा निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच वाढदिवसाचा सर्वात मोठा आणि मौल्यवान ठेवा आहे. समाजातील वंचित आणि विशेष घटकांना सोबत घेऊन आनंद साजरा करण्यात एक वेगळेच समाधान मिळते.”या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी आणि पालकांनी विनायक स्वामी यांचे विशेष आभार मानले, तसेच त्यांच्या भावी वाटचालीस आणि सामाजिक कार्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सोमनाथ मंगरुळे, विनायक भोसले, युवराज सोनटक्के, ओमकार देशमुख, राज राठोड, आदित्य देशमुख ,बॉबी कलशेट्टी, समर्थ कडगंची व परिसरातील अनेक नागरिक आणि त्यांचे स्नेही उपस्थित होते.
Post Views: 4