मुंबई : पाणीटंचाई, शिक्षकांची रिक्त पदे, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रलंबित जन्मदाखले तसेच स्थानिक विकासकामांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न प्राधान्याने चर्चिला गेला. यावेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे दूरदृश्यप्रणालीद्वारे आणि उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, स्थानिक बैठकीत उपस्थित होते.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे शिक्षण व विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर महसूल, ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने समन्वय साधून पात्र आदिवासी विद्यार्थ्यांना जन्मदाखले तातडीने उपलब्ध करून द्यावेत. तालुक्यात १०४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच उन्नतीवाडी, केंद्र शाळा नागोठणे आणि माहुळगे आदिवासीवाडी येथील शाळांमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गांना मंजुरी देण्यात देण्यासाठी कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याच्या प्रस्तावावर यावेळी चर्चा झाली. सुमारे दोन किलोमीटर अंतरासाठी जी.आय. पाइपलाइन एचडीपीई पाइपलाइन तसेच काँक्रीट ब्लॉक्सचा वापर करण्यासह आवश्यक तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यात आला. पाणीटंचाईच्या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.
याशिवाय स्थानिक विकासकामे, आरोग्य, पाणीपुरवठा आणि शिक्षणाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित समस्या प्राधान्याने सोडवून त्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.



















