बार्शी – बार्शीतील प्रोॲक्टिव्ह अबॅकसची विद्यार्थिनी कु. संस्कृती शिंदे हिने राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस (गणित) स्पर्धेत यश संपादन करत बार्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रोॲक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन– २०२६ मध्ये देशभरातील सुमारे ७५० स्पर्धकांमधून ९ वर्षे वयोगटात संस्कृतीने अवघ्या ५ मिनिटे ५ सेकंदांत १०० पैकी १०० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
संस्कृतीला बार्शी येथे जयश्री चाटे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अबॅकसचे प्रशिक्षण मिळाले. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच संस्कृतीने राष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. अबॅकस प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची गणिती क्षमता, स्मरणशक्ती, एकाग्रता, वेगवान विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होते. संस्कृतीच्या या यशामुळे बार्शीसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.
आगामी इंटरनॅशनल स्पर्धेतही ती भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संस्कृतीच्या या उल्लेखनीय यशामुळे आता पुणे येथे होणाऱ्या इंटरनॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Post Views: 14