कळंब : आगाज फाउंडेशन आणि आझाद ग्रुपच्या वतीने दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा राज्यस्तरीय ‘सलिमभाई मिर्झा समाजरत्न पुरस्कार’ यंदा लातूरचे सामाजिक कार्यकर्ते व प्रभावी व्याख्याते मोहसीन खान यांना जाहीर करण्यात आला आहे. आगाज फाउंडेशनचे अध्यक्ष अकिब पटेल आणि सचिव मुस्तान मिर्झा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुरस्कारासाठी मोहसीन खान यांच्या नावाची निवड करण्यात आली. स्वर्गीय सलिमभाई मिर्झा यांच्या सामाजिक कार्याच्या स्मृती जपण्यासाठी हा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार दरवर्षी पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान केला जातो. यंदा २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी आयोजित विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्वर्गीय सलिमभाई मिर्झा यांचे बंधू मुख्तार मिर्झा, त्यांचे कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते मोहसीन खान यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे आगाज फाउंडेशनचे सचिव मुस्तान मिर्झा यांनी सांगितले.
मोहसीन खान हे स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, शहीद टिपू सुलतान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष, अल्पसंख्याक बहुभाषिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.मुस्लिम समाजाच्या आरक्षण, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या प्रश्नांवर त्यांनी राज्यव्यापी आंदोलने व जनजागृती मोहिमा राबवल्या आहेत. मुस्लिम आरक्षण व शिक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात १०० हून अधिक मेळावे व सभा घेतल्याचे सांगण्यात आले. तसेच CAA-NRC संदर्भात राज्यव्यापी जनजागृती, वक्फ महामंडळाच्या कारभाराविरोधात आंदोलन तसेच छोटे-मोठे व्यावसायिक, टपरीधारक आणि हातगाडी व्यावसायिकांच्या प्रश्नांसाठीही त्यांनी आंदोलने केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाजाचे संबंध, शहीद टिपू सुलतान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्यही मोहसीन खान यांनी केले आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असलेले प्रभावी व्याख्याते म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक, शैक्षणिक, जनजागृती आणि व्याख्यानाच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेत यंदाचा राज्यस्तरीय ‘सलिमभाई मिर्झा समाजरत्न पुरस्कार’ मोहसीन खान यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमाला जास्तीत लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आझाद ग्रुपचे अध्यक्ष तथा नगरसेवक मोहसीन मिर्झा यांनी केले.
Post Views: 8