बार्शी – शहरातील तुळजापूर नाका परिसरात किरकोळ कारणावरुन एका तरुणास शिवीगाळ करुन मारहाण करत त्याच्या डोक्यात विटेचा तुकडा मारुन जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपीविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष सुभाष गंगावणे (वय ३६, रा. राणा कॉलनी, तुळजापूर नाका, बार्शी) हे ३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मांगडे चाळ येथून राणा कॉलनीकडे पायी जात होते. विश्वास शेंडगे यांच्या घरासमोरील रस्त्यावर असताना आरोपी अरबाज सय्यद शेख हा त्यांच्या जवळ आला.
यावेळी आरोपीने कोणतेही कारण नसताना फिर्यादीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी त्यास शिवीगाळ करण्यास मज्जाव केला असता आरोपीने संतापून त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जवळच पडलेला विटेचा तुकडा उचलून फिर्यादीच्या डोक्याच्या मागील बाजूस मारल्याने ते गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच फिर्यादीचा भाऊ विनोद गंगावणे यांनी त्यांना तत्काळ बार्शी येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान फिर्यादीने दिलेल्या जबाबाच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, बार्शी शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 7