बार्शी – फेसबुकवरील शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आकर्षक जाहिरातीला भुलून बार्शीतील एका ६३ वर्षीय निवृत्त बँक कर्मचाऱ्याची तब्बल २ कोटी १४ लाख ९५ हजार ५७६ रुपये २० पैशांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात विविध कंपन्या व संबंधित व्यक्तींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 चे कलम 66 (C), 66(D) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 316(2) व 318(4) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी मोहन जगन्नाथ गायकवाड (वय ६३, रा. कसबा पेठ, एकविराई मंदिराजवळ, बार्शी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये फेसबुक पाहत असताना त्यांना “27 Acume” या नावाची शेअर मार्केटसंदर्भातील जाहिरात दिसली. त्यावर क्लिक केल्यानंतर त्यांना “27 Acume Stock Capital” या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. त्यानंतर स्वतःला कंपनीचे प्रतिनिधी सांगणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधून दररोज ५ ते २५ टक्के परतावा मिळण्याचे आमिष दाखवत “Acume Pro App” डाउनलोड करण्यास सांगितले. तसेच केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन त्यांचे ट्रेडिंग खाते सुरु करण्यात आले.
सुरुवातीला अल्प रक्कम गुंतविल्यानंतर ॲपवर नफा दिसू लागला. काही वेळा त्यांनी काढलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यानंतर संबंधितांनी सातत्याने फोन करुन अधिक गुंतवणूक करण्यासाठी दबाव टाकला. त्यानुसार फिर्यादी यांनी जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध कंपन्यांच्या नावाने देण्यात आलेल्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएस व यूपीआयद्वारे एकूण २,१४,९५,५७६.२० रुपये जमा केले.
काही दिवसांनी ॲपवरील शिल्लक व नफा मोठ्या प्रमाणात दिसत असतानाही प्रत्यक्ष पैसे काढता आले नाहीत. संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे सर्व मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळले. तसेच Acume Pro App हे ॲपही मोबाईलमधून आपोआप हटविले गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणात Acume Pro App, राधे एन्टरप्रायझेस, Agro Gems Chemical, Tanba Ram S.S.S, New Volga Traders, बी. व्ही. ट्रेडर्स, स्वास्तीक एन्टरप्रायजेस, एस. व्ही. बी. एन्टरप्रायजेस, अनुष्का शिक्षण प्रसारक मंडळ, रेणुदार सर्व्हिसेस आणि शिवाशिव कन्स्ट्रक्शन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 6