बैठकीत दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या अनेक प्रकल्पांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले. यामध्ये भीमा-सीना जोड कालवा प्रकल्प, कुडल संगम तीर्थक्षेत्राचा विकास, सीना-भीमा नदीवरील बॅरेजेस, मंद्रूप येथील नवीन बसस्थानक, होटगी येथील आयटी पार्क, जुळे सोलापूर येथे आधुनिक नाट्यगृह उभारणी, दुबई युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शनासाठी शासकीय सहकार्य, कौशल्य विकास विद्यापीठाची उभारणी तसेच शासनाच्या विविध विकासकामे आणि जनहिताच्या योजनांचा समावेश होता.
आमदार सुभाष देशमुख यांनी या सर्व विषयांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून आवश्यक पाठपुरावा करण्याची विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही प्रत्येक विषयाची सकारात्मक दखल घेत संबंधित कामांना गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, औद्योगिक वाढ, कौशल्य विकास आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर सकारात्मक चर्चा झाली. या विकासकामांमुळे दक्षिण सोलापूरसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.



















