सोलापूर – शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रवेश प्रणाली अद्याप सुरू न झाल्यामुळे स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रश्नाबाबत सोलापूर शहर-जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष दशरथ गुरुव यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात पुणे विभागीय क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि लवकरात लवकर प्रणाली सुरू करण्याची मागणी केली.
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपत आला असतानाही अद्याप प्राथमिक प्रवेशिका भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. प्रत्येक शाळेतील क्रीडा शिक्षकांना प्रत्येक खेळाडूची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी बराच वेळ लागतो. प्राथमिक प्रवेशिका भरल्यानंतर अंतिम ऑनलाईन एन्ट्री आणि त्यानंतर स्पर्धांचे आयोजन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याच्या स्पर्धांच्या तारखा आधीच जाहीर झाल्यामुळे जिल्हा आणि विभाग स्तरावरील स्पर्धांचे नियोजन कसे होणार, असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच सध्या शाळांमधील क्रीडा शिक्षकांना एस.आर.ए. (SRA) ची ड्युटी देण्यात आल्याने त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे.
या सर्व बाबींचा विचार करून क्रीडा स्पर्धांच्या नियोजनात अडथळा येऊ नये, यासाठी लवकरात लवकर ऑनलाईन प्रवेश प्रणाली सुरू करावी, अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली. यावेळी विविध शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते.



















