बार्शी – तालुक्यातील वखारिया विद्यालय, उपळे दुमाला येथे शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई आयोजित बाल चित्रकला स्पर्धा पंचायत समिती बार्शी यांच्या सहकार्याने पार पडली. या भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे केंद्र विशेष आकर्षणाचे ठरले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपळे केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप म्हमाणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांनी केंद्रप्रमुख म्हमाणे यांचे स्वागत व बुके देऊन सत्कार केला. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या परिसरातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी प्रतिनिधींना गुलाबपुष्प देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला.
स्पर्धेच्या उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध आयोजनाबद्दल पंचायत समिती बार्शीच्यावतीने मुख्याध्यापक दयानंद रेवडकर आणि केंद्र समन्वयक नवनाथ महाले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
चौकट
कमी कालावधीत सर्व शाळांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी प्रोत्साहित केले गेले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल २४० विद्यार्थ्यांनी या केंद्रावरुन चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही अत्यंत चांगली बाब आहे.
— श्री. म्हमाणे (केंद्र प्रमुख )
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास वखारिया विद्यालयाचे शिक्षक रमेश लंकेश्वर, दत्तात्रेय राऊत, अतुल राठोड, अनिल वैद्य, प्रशांत काशीद, मकरंद जगदाळे, रेवनसिद्ध दुलंगे, यश पवार, दादासाहेब धनके, विकास बुरगुटे यांच्यासह उपळे दुमाला व परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 29