बार्शी – ‘तू मला आवडतेस, माझी बायको हो; मोबाईल घेऊन देतो,’ म्हणत अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करुन विनयभंग केल्याचा प्रकार बार्शी शहरातील अलीपूर रोड परिसरात घडला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलाने मुलीशी बोलताना तिला लग्नाचे आमिष दाखवले.
तसेच विरोध केल्यानंतर हाताने मारहाण करुन केस ओढल्याचा आरोप मुलीने आपल्या पालकांना सांगितल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे. पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार, पीडित अल्पवयीन मुलगी एका विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ती नातेवाइकांच्या मुलीसोबत शाळेत गेली होती. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शाळेजवळ संबंधित व्यक्तीने ‘तू मला आवडतेस, तू माझी बायको हो, मी तुला मोबाईल घेऊन देतो,’ असे म्हटल्याचे मुलीने सांगितले. त्यावर मुलीने याबाबत शिक्षकांना सांगते म्हटल्यावर त्या मुलाने तिला मारहाण केली व केस ओढले, असा आरोप आहे. त्यानंतर तो तेथून निघून गेल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. घडलेला प्रकार मुलीने दुपारी पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.