बार्शी – अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या संघटनात्मक विस्ताराला बळ देण्यासाठी बार्शी येथील ॲड. जीवनदत्त आरगडे यांची पूर्व उत्तर प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आरगडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीनुसार, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखपालसिंग खैरा यांच्या सूचनेवरून संघटन प्रभारी तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिलेश शुक्ला यांनी ही नियुक्ती केली आहे. ६ ऑगस्ट रोजी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे आरगडे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.