सोलापूर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सोलापूर महापालिकेकडून १०० इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १७ ऑगस्ट रोजी रेल्वेच्या मालवाहतूक गाडीतून केसरी रंगाच्या २० इलेक्ट्रिक बसेस सोलापुरात दाखल होणार आहेत. उर्वरित ८० बसेस डिसेंबरअखेरपर्यंत सोलापुरात दाखल होणार असल्याची माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.
इलेक्ट्रिक बसेसचा रंग केसरी निश्चित करण्यात आला आहे. बससेवा सुरू करण्यापूर्वी बसेसच्या रंगासह अन्य बाबींवर चर्चा करून मान्यता घेण्यासाठी हा विषय महापालिकेच्या सभेत मांडण्यात येणार आहे.
शहरात ५० स्मार्ट बसस्टॉप उभारण्यात येणार असून, या बसस्टॉपवर सौरऊर्जेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बसस्टॉपच्या एका बाजूला खासगी कंपन्यांच्या जाहिराती, तर उर्वरित दोन बाजूंना महापालिकेच्या जाहिराती असतील. जाहिरातींचा मक्ता लोटस कंपनीला देण्यात आला असून, कंपनीकडून प्रत्येक बसस्टॉपमागे प्रतिमहा १ हजार ५०० रुपये भाडे महापालिकेला मिळणार आहे.
प्रत्येक बस रोज १८० किलोमीटर धावणार
महापालिकेने इलेक्ट्रिक बसेसचे बसमार्ग निश्चित केले आहेत. प्रत्येक बसने दररोज किमान १८० किलोमीटर धावणे बंधनकारक राहणार आहे. त्यासाठी जेबीएम कंपनीला महापालिकेकडून प्रति किलोमीटर २३ रुपये मोबदला देण्यात येणार आहे. याशिवाय केंद्र व राज्य सरकारकडून संबंधित कंपनीला अनुदान मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी महापालिका आणि जेबीएम कंपनीमध्ये तीन वर्षांचा करार करण्यात आला आहे. बसेसचे संपूर्ण व्यवस्थापन जेबीएम कंपनीकडे राहणार असल्याचे महापौर कोंड्याल यांनी सांगितले.
१५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला
शहरात १०० इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यासाठी महापालिकेने जेबीएम कंपनीशी २०० पानी करार केला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १५ ऑगस्ट रोजी ३० इलेक्ट्रिक बसेस सोलापुरात येणार होत्या. मात्र, १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला असून आता १७ ऑगस्ट रोजी पहिल्या २० बसेस सोलापुरात दाखल होणार आहेत.
प्रत्येक बसने दररोज किमान १८० किलोमीटर धावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच २०३७ पर्यंत या बसेसची मालकी जेबीएम कंपनीकडे राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
—
Post Views: 16