सोलापूर : प्रबोधन, लोकशिक्षण आणि समाजाभिमुख पत्रकारितेची ४२ वर्षांची समृद्ध परंपरा जपणाऱ्या दैनिक तरुण भारतच्या ४२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, औद्योगिक यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, वाचक, हितचिंतक आणि जाहिरातदार मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने सोहळ्याला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
औद्योगिक वसाहतीतील सोसायटीच्या सभागृहात हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वर्धापन दिनानिमित्त सभागृहाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे मनःपूर्वक पूजन करण्यात आले. नेटके नियोजन, प्रसन्न वातावरण आणि मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती यामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली. विचारमंचावर दैनिक तरुण भारतचे समूह संपादक दिलीप पेठे आणि मुख्य संपादक प्रशांत माने उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच काही मान्यवरांनी पुस्तक भेट देत वाचन संस्कृती आणि वाचन चळवळ अधिक समृद्ध करण्याचा संदेश दिला.
४२ वर्षांच्या प्रवासाला उजाळा
यावेळी उपस्थितांनी दैनिक तरुण भारतच्या गेल्या ४२ वर्षांच्या समृद्ध वृत्तकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या प्रदीर्घ वाटचालीतील विविध आठवणींना उजाळा देताना ‘तरुण भारत’ने केवळ वृत्तपत्र म्हणून नव्हे, तर प्रबोधन आणि लोकशिक्षणाची चळवळ म्हणून आपली भूमिका बजावली, अशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.
सोलापूरच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक घडामोडींचा साक्षीदार राहिलेल्या ‘तरुण भारत’ने सामान्य माणसाच्या प्रश्नांना सातत्याने व्यासपीठ दिले. बदलत्या काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप बदलत असतानाही वाचकांशी असलेले विश्वासाचे नाते कायम राखण्यात वृत्तपत्राला यश आले, असा गौरवपूर्ण सूर यावेळी उमटला.
‘तरुण भारत’ पत्रकारितेतील मानदंड
विश्वासार्हता, सातत्य आणि समाजाभिमुख पत्रकारिता या त्रिसूत्रीच्या बळावर दैनिक तरुण भारतने वृत्तपत्रसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ४२ वर्षांची वाटचाल ही केवळ एका वृत्तपत्राची नव्हे, तर वाचकांशी निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याची कहाणी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.वृत्तपत्रसृष्टीतील दैनिक तरुण भारत हा एक मानदंड आहे, असा गौरवपूर्ण उल्लेखही विविध मान्यवरांनी आपल्या चर्चेतून केला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे ‘तरुण भारत’च्या पुढील वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली.
वाचक, हितचिंतक आणि जाहिरातदारांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ४२ वा वर्धापन दिन सोहळा अविस्मरणीय ठरला. ४२ वर्षांच्या समृद्ध परंपरेला उजाळा मिळाला. दरम्यान राजकीय क्षेत्रातील विद्यमान आमदार, माजी आमदार यांच्यासह राजकीय मंडळींची उपस्थिती होती. त्यामुळे चांगल्याच राजकीय गप्पाही रंगल्या होत्या. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिक रंगतदार ठरला.
महापालिका आयुक्तांसह मान्यवरांनी
बुके ऐवजी दिले बुक भेट
सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासह इतर मान्यवरांनी बुके ऐवजी बुक (पुस्तक) घेऊन शुभेच्छा दिल्या. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी “द केसिज दॅट इंडिया फॉरगॉट,‘अ मस्ट-रीड.’ फॉल नरीमन”हे पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या आणि आवर्जून वाचण्याची सूचना केली.
Post Views: 11