सोलापूर – युवकांमधील सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि समाजोपयोगी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा ‘जिल्हा युवा पुरस्कार सन २०२५-२६’ जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा युवा पुरस्कार व युवा महोत्सव समिती, सोलापूरच्या बैठकीत सविस्तर छाननी, गुणांकन व चर्चेनंतर युवक, युवती आणि संस्था या तीन प्रवर्गातील पुरस्कारार्थींची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश मोहारे यांनी सांगितले.
युवा व युवती पुरस्काराचे मानकरीगुजमील कमलीवाले, डॉ. चंदाराणी क्षीरसागर तर संस्था पुरस्काराचे मानकरी कोंडीचे जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ हे ठरले आहेत. या पुरस्काराचे वितरण येत्या स्वातंत्र्यदिनी, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी येथे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवक, युवती आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या कार्यातून इतर युवकांना प्रेरणा मिळावी, हा या जिल्हा पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे.
निवड झालेले मानकरी:
युवक- गुजमील खलील कमलीवाले (पंढरपूर) : श्री. कमलीवाले यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण व मानवतावादी क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य केले आहे. आरोग्य शिबिरे, रक्तदान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि स्वच्छता अभियान यांसारख्या विविध उपक्रमांतून त्यांनी समाजसेवेचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
युवती- डॉ. चंदाराणी अशोक क्षीरसागर (कुरुल, ता. मोहोळ): वैद्यकीय व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी ग्रामीण व गरजू नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी, औषधोपचार व विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवून राष्ट्रउभारणीत योगदान दिल्याबद्दल त्यांची युवती प्रवर्गातून निवड झाली आहे.
संस्था – जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ (कोंडी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) : या संस्थेने शिक्षण, महिला सबलीकरण, दुर्बल घटकांसाठी कार्य, आपत्ती व्यवस्थापन, क्रीडा, पर्यावरण आणि आरोग्यासोबतच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. संस्थेच्या या बहुआयामी व व्यापक कार्याची दखल घेत संस्थेची संस्था प्रवर्गातून निवड करण्यात आली आहे

















