मंगळवेढा : नगरपालिका शिक्षण मंडळ, मंगळवेढा संचलित न. पा. मुला – मुलींची शाळा क्र. ५ ने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) – २०२६ मध्ये दैदिप्यमान यश संपादन करत मंगळवेढ्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी शाळेचे तब्बल २३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले. त्यापैकी स्वराज शिवाजी पवार याने राज्यात ७ वा व सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक, जयदीप गणेश सुतार याने राज्यात ८ वा व सोलापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक, तर स्वानंदी विशाल गायकवाड हिने राज्यात ११ वा व सोलापूर जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला. उर्वरित २० विद्यार्थ्यांनीही गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या गौरवशाली परंपरेत मोलाची भर घातली.
यावर्षी गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वराज शिवाजी पवार (राज्य गुणवत्ता क्रमांक ७), जयदीप गणेश सुतार (राज्य गुणवत्ता क्रमांक ८), स्वानंदी विशाल गायकवाड (राज्य गुणवत्ता क्रमांक ११), सई नितीन कदम (१४), राजवीर अर्जुन दत्तू (१८), अर्णव बसवराज पाटील (२२), शौर्य दत्तात्रय पवार (३०), राणावत सचिन गोवे (३३), सृजन समाधान टकले (३९), रणवीर सतीश दत्तू (४७), श्रुती संदीप शिंदे (६२), सर्वेश विजयकुमार माळी (७२), आदेश परमेश्वर पाटील (७५), समरजीत सुभाष देशमुख (८२), आदित्य रमेश पाटील (८८), शौर्य महेश हेंबाडे (१३७), मंदार सुरेश पुजारी (१४०), धर्मराज प्रकाश शिंदे (१६९), श्रद्धा मोहन देवकर (१९१), संस्कार मारुती लोंढे (२०५), आराध्या शामराव आठवले (२४६), श्रीजीत सचिन इंगळे (२५१) आणि शर्वरी अमोल अवताडे (२५८) या विद्यार्थ्यांचा समावेश असून, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शाळेच्या यशात मोलाची भर घातली आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची अथक मेहनत, पालकांचे मोलाचे सहकार्य आणि शाळेत इयत्ता पहिलीपासून राबविण्यात आलेले नियोजनबद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हे प्रमुख कारण ठरले. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत व्हावा यासाठी भाषा, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, वाचन कौशल्य, तर्कशक्ती, आकलन क्षमता आणि विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित करण्यावर सातत्याने भर देण्यात आला. नियमित सराव परीक्षा, कार्यपत्रिका, पुनरावृत्ती, शिष्यवृत्तीच्या धर्तीवरील प्रश्नपत्रिकांचा सराव आणि वैयक्तिक मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, अभ्यासाची सवय आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण झाली.
मार्गदर्शक शिक्षक श्री. विशाल गायकवाड यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेचा अभ्यास करून स्वतंत्र नियोजनाच्या माध्यमातून वर्षभर सातत्यपूर्ण सरावावर भर दिला. विद्यार्थ्यांचा केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा त्यांच्या विचारशक्तीचा, निरीक्षणक्षमतेचा, स्मरणशक्तीचा आणि समस्या सोडविण्याच्या कौशल्याचा विकास व्हावा, या उद्देशाने विविध शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत आत्मविश्वास निर्माण करून अभ्यासाची गोडी लावणे, सातत्यपूर्ण मार्गदर्शन करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे, यासाठी वर्षभर नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले. या परिणामकारक अध्यापन पद्धतीचे फलित म्हणजे शाळेला मिळालेले हे ऐतिहासिक यश होय.
शाळेच्या या यशाबद्दल पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. समाधान आवताडे, नगराध्यक्षा मा. सौ. सुनंदा आवताडे, उपनगराध्यक्ष मा. श्री. येताळा भगत, शिक्षण समितीचे सभापती मा. श्री. सोमनाथ आवताडे, आरोग्य समितीचे सभापती मा. श्री. प्रवीण खवतोडे, नगरसेविका मा. सौ. विद्यागौरी अवघडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मा. सौ. विजया गुंगे, गटशिक्षणाधिकारी मा. श्री. दर्शन मेहता, प्रशासनाधिकारी मा. श्री. बिभीषण रणदिवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. परमेश्वर पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, मुख्याध्यापक श्री. शिवानंद कोळी, उपशिक्षिका सौ. भाग्यश्री काळुंगे आणि मार्गदर्शक शिक्षक श्री. विशाल गायकवाड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“असाध्य ते साध्य करिता सायास” या शाळेच्या बोधवाक्याला साजेशा या यशामुळे न. पा. मुला – मुलींची शाळा क्र. ५ ने प्राथमिक शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा क्षेत्रातही आपले वेगळेपण सिद्ध केले असून, या निकालामुळे संपूर्ण मंगळवेढा शहराच्या शैक्षणिक वैभवात मानाची भर पडली आहे.
Post Views: 12