बार्शी – आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा उदरनिर्वाह व कल्याण अधिनियम, २००७ अंतर्गत दाखल प्रकरणात साकत येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती राजाबाई बन्सीलाल मोरे यांना दरमहा ९ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर क्र. १ यांच्या न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित साईप्रसाद पांडुरंग मोरे यांना मंडळ अधिकारी कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
राजाबाई मोरे यांनी मुलगा साईप्रसाद मोरे हा आपला सांभाळ करीत नसल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत निर्वाह भत्त्यासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान सामनेवाल्याने भीती दाखवून अंध आजोबांकडून वडिलार्जित मिळकतीचे मृत्युपत्र करून घेतल्याचा तसेच अर्जदार वयोवृद्ध आजीचा सांभाळ केला जात नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. तसेच संबंधिताचे बागायती शेती व खासगी नोकरीतील उत्पन्न असल्याचे युक्तिवादातून सिद्ध करण्यात आले.
या प्रकरणात १० जुलै २०२६ रोजी अंतिम निकाल देत न्यायालयाने आदेशाच्या दिनांकापासून राजाबाई मोरे यांना दरमहा ९ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचे निर्देश दिले. तसेच अर्जदारास सन्मानाची वागणूक देणेही बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले.
आदेशाच्या अंमलबजावणीसाठी ५ ऑगस्ट रोजी नोटीस बजावण्यात आली असून, तीन दिवसांच्या आत आदेशाचे पालन कशाप्रकारे केले जात आहे, याबाबत लेखी खुलासा व पुराव्यासह कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास कायद्यानुसार पुढील कायदेशीर व दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
अर्जदारातर्फे ॲड. राहुल पाटील यांनी युक्तिवाद केला. त्यांच्यासोबत ॲड. विवेक गजशिव व ॲड. श्रीराम काशीद यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
Post Views: 16