सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील तब्बल ९० टक्के शाळांच्या इमारती धोकादायक अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला आहे. बबलाद येथील जिल्हा परिषद शाळेच्या छताचा काँक्रीटचा भाग कोसळून विद्यार्थी जखमी झाल्यानंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप करत त्यांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर जोरदार टीका केली. ‘शिक्षकांवर कारवाई करण्यापेक्षा शाळांच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा,’ अशी मागणी त्यांनी केली.
बबलाद दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हेत्रे यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी त्यांनी दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
दुर्घटनेच्या वेळी छताचा भाग कोसळत असताना दोन शिक्षकांनी प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचे प्राण वाचविताना हे शिक्षक जखमी झाले. अशा शिक्षकांचे कौतुक करण्याऐवजी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत असेल, तर हा अन्याय असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.
बबलाद दुर्घटनेच्या निमित्ताने अक्कलकोट तालुक्यातील शाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे धोकादायक शाळांची तातडीने संरचनात्मक तपासणी, विद्यार्थ्यांसाठी पर्यायी वर्गव्यवस्था आणि आवश्यक दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी यासाठी प्रशासनाने कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. केवळ कागदी अहवाल न करता विद्यार्थ्यांच्या जीविताला प्राधान्य देऊन प्रत्यक्ष उपाययोजना करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
कोट
चोर सोडून साधूला फाशी देण्याचा प्रकार
“दोषींना सोडून शिक्षकांवरच कारवाई होत असेल, तर हा चोर सोडून साधूला फाशी देण्यासारखा प्रकार आहे. दुर्घटनेला जे कोणी जबाबदार असतील, ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांच्यावर निष्पक्षपणे कारवाई झाली पाहिजे,” असे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.
चौकट १
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कारभारावर निशाणा
शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असताना शिक्षण विभागाची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित करत म्हेत्रे यांनी अक्कलकोटच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. “अशीच परिस्थिती राहणार असेल तर गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणमंत्र्यांनीच करावे,” अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.
चौकट २
११० विद्यार्थी अजूनही सुरक्षित छताच्या प्रतीक्षेत
बबलाद शाळेतील दुर्घटनेला काही दिवस उलटूनही सुमारे ११० विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी वर्गखोल्यांची व्यवस्था झालेली नसल्याचा आरोप म्हेत्रे यांनी केला. विद्यार्थ्यांना उघड्यावर बसवून शिक्षण देण्याची वेळ आली असून, पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नसल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता प्रशासनाने तातडीने पर्यायी वर्गखोल्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
चौकट ३
‘९० टक्के शाळा धोकादायक’ असल्याचा दावा
बबलाद दुर्घटना ही केवळ एका शाळेपुरती मर्यादित बाब नसून अक्कलकोट तालुक्यातील शाळांच्या सुरक्षिततेचा व्यापक प्रश्न असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, तालुक्यातील सुमारे ९० टक्के शाळांच्या इमारती धोकादायक अवस्थेत आहेत.शाळांच्या इमारतींची नियमित संरचनात्मक तपासणी, वेळेवर दुरुस्ती आणि धोकादायक इमारतींना पर्यायी व्यवस्था करण्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले असते, तर दुर्घटना टाळता आली असती, असेही त्यांनी नमूद केले.
चौकट ४
हैद्रा येथील २० लाखांच्या कामाची चौकशीची मागणी
हैद्रा येथील सुमारे २० लाख रुपयांच्या विकासकामातही गैरप्रकार झाल्याचा आरोप म्हेत्रे यांनी केला. मंजूर निधी, प्रत्यक्ष झालेले काम आणि कामाची गुणवत्ता यांची स्वतंत्र चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
Post Views: 13