टेंभुर्णी : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी बसस्थानक व बायपास परिसरात घडलेल्या एका संतापजनक आणि धक्कादायक घटनेने संपूर्ण टेंभुर्णी परिसर हादरून गेला आहे. कौटुंबिक वादानंतर कामाच्या शोधात घराबाहेर पडलेल्या २६ वर्षीय तरुणीला कामाचे आमिष दाखवत निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे तिला जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. विरोध केल्यानंतर तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पाच आरोपींना अटक करून तपासाला वेग दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कौटुंबिक वादामुळे घर सोडून मंगळवारी कामाच्या शोधात टेंभुर्णी बसस्थानकावर आली होती. सायंकाळी सातच्या सुमारास बसस्थानक परिसरात असताना आरोपींनी तिची असहाय्य परिस्थिती हेरली. “काम मिळवून देतो” असे सांगून तिला टेंभुर्णी बायपास परिसरातील निर्जन ठिकाणी नेण्यात आले.
तेथे आरोपींनी तिला जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित महिलेने स्पष्ट नकार दिल्यानंतर दोन आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात इतर आरोपींनीही सक्रिय भूमिका बजावल्याचा आरोप पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यात करण्यात आला आहे.
घटनेनंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत गुरुवारी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. तिच्या फिर्यादीवरून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी (IPS) अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे वेगाने हलविण्यात आली. तांत्रिक माहिती, प्राथमिक पुरावे आणि स्थानिक चौकशीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पाचही आरोपींना अटक केली.
दरम्यान, या घटनेनंतर टेंभुर्णी शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बसस्थानक आणि बायपास परिसरात संशयास्पद हालचाली, अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढत असल्याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे या परिसरात कायमस्वरूपी पोलीस गस्त वाढविणे, सीसीटीव्ही यंत्रणा अधिक प्रभावी करणे आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांची सखोल पडताळणी केली जात आहे. तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली असून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या घटनेमुळे टेंभुर्णीसह परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, तपास सुरू असल्याने उपलब्ध पुरावे आणि तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे आवश्यक असल्यास आणखी संबंधित व्यक्तींविरुद्धही कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशी शक्यता तपासाच्या अनुषंगाने वर्तविली जात आहे. पोलिसांनी मात्र याबाबत अधिकृतपणे कोणतीही अतिरिक्त माहिती जाहीर केलेली नाही.
Post Views: 16