सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेच्या धोकादायक झालेल्या इमारतीतील खोल्यांवर तातडीने उपाययोजना करून त्या नव्याने बांधून द्याव्यात, अशी मागणी पंचायत समिती सदस्य उत्तम वाघमारे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे केली आहे.
सुलेरजवळगे येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा कार्यरत आहे. शाळेच्या इमारतीतील एकूण सहा वर्गखोल्या जुन्या व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने या खोल्यांमध्ये अध्यापन करणे धोकादायक झाले आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी या सर्व वर्गखोल्यांची तातडीने पुनर्बांधणी करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली.
दरम्यान, शाळेसमोरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यायी ठिकाणी व्यवस्था करून जिल्हा परिषदेच्या जागेत कन्नड शाळेची नवीन इमारत उभारण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी चंद्रकांत बाके यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.