सोलापूर – शनिवार दि. 15 ऑगस्ट देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे पोलीस निरीक्षक संगीता हत्ती, प्राचार्य विजयकुमार चव्हाण, उपप्राचार्य शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपंचमी सणाचे औचित्य साधून वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूर या संस्थेच्या वतीने १५०० पोलीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी येथील महाराणा प्रताप ग्राउंडवर सर्पज्ञान व जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला PI कटकधोंड यांनी WCAS अध्यक्ष अजित चौहान यांचा परिचय व बुके देऊन सत्कार केला तर PI निंबाळकर यांनी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश क्षीरसागर यांचा परिचय व सत्कार केला. यानंतर अजित चौहान यांनी यांनी सोलापूर जिल्ह्यात आढळणाऱ्या विविध प्रजातीच्या सापांची पोस्टरच्या सहाय्याने माहिती दिली. विषारी आणि बिनविषारी सापाबद्दलची श्रद्धा अंधश्रद्धा तसेच सापापासून होणारे फायदे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तर शिवानंद हिरेमठ यांनी सापाच्या विषाचे प्रकार व सर्पदंशाची लक्षणे यावर मार्गदर्शन केले. भर रणरणत्या उन्हातही पोलीस प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रसाद प्रतिसाद दिल्यामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या माहितीपूर्ण सत्रात पोलीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक संगीता हत्ती म्हणाल्या की, या सर्पज्ञान व जनजागृती माहिती सत्राचा उपयोग पोलिसांना आपत्ती व्यवस्थापनामध्ये निश्चितच होईल असा विश्वास व्यक्त करून सदस्यांचे या मार्गदर्शनपर सर्पज्ञान सत्राचे आयोजन केल्याबद्दल WCAS संस्थेचे आभार व्यक्त केले. यावेळी संतोष धाकपडे उपस्थित होते.

























