बार्शी – गतवर्षीच्या श्रीमद् भागवत कथामृतातील दोन स्कंधावरील चिंतनाचा संदर्भ देत आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या दिवशीच्या निरुपणात श्रीमद् भागवत कथा अमृतातील तिसऱ्या स्कंधापासून सुरुवात करताना ह.भ. प. बोधले महाराज म्हणाले, मृत्यू भयभीत राजा परीक्षितांनी श्रीभगवंताकडे आपल्याला पवित्र मनाचे, तत्वग्राहिणी विदुर आणि साधू शिरोमणी मैत्रेय या दोन महात्म्यांमधील उच्च पराकोटीचा संवाद ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांना भेटायचे कोठे याबाबत संभ्रम असताना श्रीकृष्ण शिष्ठाई अपयशी ठरल्याने आता युद्ध अटळ असल्याचे ध्रुतराष्ट्रांना कळून चुकले. म्हणून त्यांनी विदुराला विचारले की, आता या परिस्थितीत काय करावे? सल्ला देताना विदुर म्हणाले, तुम्ही माघार घ्या. कसलीही आसक्ती ठेवू नका. त्यांचे त्यांना देऊन टाका. हे धर्म आणि अधर्माचे युद्ध आहे आणि कर्म धर्म संयोगाने दुर्योधनाने धृतराष्ट्र आणि विदुरांच्या मधील संवाद कानी पडताच तो संतापला. दासी पुत्राने आम्हाला शिकवावं म्हणून दुर्योधनाने विदुराला तिथून जाण्यास सांगितले. विदुर विषण्ण मनाने तेथून निघाले पण जाताना त्यांनी आपली तलवार खाली ठेवली आणि धृतराष्ट्राला आपण संभाव्य युद्धात भाग घेणार नसल्याचे सूचित केले. त्यामुळे विदुरांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला म्हणून ते यमुनेच्या काठावर आले. अशारीतीने त्यावेळी विदुर आणि उद्धवा या दोन कृष्णभक्तांची भेट झाली दोघांनी एकमेकांना मिठी मारली.
यावेळी महाराजांनी संवाद-संगती कोणाशी असावी, कार्य म्हणजे कर्म कारण म्हणजे तत्त्व आणि कार्यकारण दोन्हीही एकच, समदृष्टी, बुद्धी म्हणजे नेमके काय सद्बुद्ध-दुर्बुद्धी, ब्रह्मतत्व इत्यादीवर विस्ताराने निरुपणामध्ये विवेचन केले.
Post Views: 17