पंढरपूर – येथील पारंपारिक रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पात समाजाच्या वतीने मंगळवारी (दि.१८ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता गौरी आणि औट घटकेचा राजा श्रीयाल शेठ यांची भव्य मिरवणूक संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावरून काढण्यात आली,सुमारे १५०वर्षांची ही परंपरा असून श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची गौर सवाद्य मिरवणुकीसह निघते,
उत्पात समाजाच्या गौर विसर्जन मिरवणुकीत उत्पात समाजातील शेकडो स्त्री पुरुष, तसेच मंदिर परिसरातील स्थानिक नागरीक उत्साहाने सहभागी झाले होते,
गौर विसर्जन मिरवणुकीचे प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते.अनेक महिला भाविक श्रद्धेने दर्शन घेऊन कुंकू घेत होत्या.गौरीस शेकडो भाविकांनी श्रीफळ वाढवून श्रद्धा व्यक्त केली.पारंपरिक ढोल ताशा, बँड पथकाच्या तालावर घोडे, उंट यासह मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी समस्त उत्पात समाजाचे अध्यक्ष अतुल उत्पात, माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात, आनंद उत्पात, महेश उत्पात, श्रीकृष्ण उत्पात, चिंतामणी उत्पात, पंढरीनाथ उत्पात, क्रांतिसिंह उत्पात आदी मान्यवर सहभागी झाले होते.
————
चौकट : (उत्पातांच्या खासगी रुक्मिणी मातेच्या मंदिरात उत्सव)
पंढरपूर येथील उत्पात समाज हा पारंपारिक श्री रुक्मिणी मातेचे पुजारी आहेत.दरवर्षी श्रावण महिन्यात गौरीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येत असे, मात्र २०१४ साली पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे शासनाच्या ताब्यात गेले.पूजेचे वंशपरंपरागत हक्क गेले मात्र तरीही उत्पात समाज हा श्री रुक्मिणी मातेची पूजाअर्चा करीत आहे,
मंदिराप्रमाणेच सर्व नित्योपचार होत असून जुनी माळी गल्ली येथे उत्पातांचे खासगी उपासना मंदिर आहे,देऊळ जाऊनही प्रथा, परंपरा जपत असल्याने शहरात उत्पात समाजाचे कौतुक केले जाते.
Post Views: 14