अक्कलकोट : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे देशाची चौफेर प्रगती झाली आहे. प्रगत दळणवळणाच्या साधनातून उद्योग- व्यवसाय भरभराटीस आले आहेत. विकासाचा दर वाढला आहे. देशात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रस्थापित झाली आहे, अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी विघातक शक्तींना धडा शिकवण्यासाठी संविधानिक तत्वानुसार विकसित भारताचे स्वप्न पहावे .असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील इतिहास अभ्यास मंडळाच्या वतीने संविधान दिन व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.राजेंद्रसिंह लोखंडे, डॉ.विठ्ठल वाघमारे उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, डॉ आंबेडकर यांच्या संविधानामुळे दुर्लक्षित समाजाची प्रगती झाली आहे. शहीदांनी दिलेल्या बलिदानामुळे देशात शांतता नांदत आहे म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांचे स्मरण केले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.आर.लोखंडे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉ. शितल झिंगाडे-भस्मे यांनी केले. प्रा.सौरभ भस्मे यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केले. आभार प्राध्यापिका मधुबाला लोणारी यांनी मानले. कार्यक्रमास प्रा
गुरुशांत हपाळे,सचिन फुटाणे, प्रा जनाबाई चौधरी, प्रा.शितल फुटाणे, प्रा.सविता स्वामी उपस्थित होते.
चौकटीतील मजकूर
प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना श्रद्धांजली
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल, ओबेराय हॉटेल, कामा रुग्णालय आणि नरिमन हाऊस येथे झालेला दहशतवादी हल्ल्यात निरापराध नागरिक पोलीस अधिकारी आणि सुरक्षा जवानांनी आपले प्राण गमावले त्यांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली.
शहिदांचे स्मरण अन डोळ्यात अश्रू
पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, मेजर संदीप उन्नीकृष्णनन, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे यांनी दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. हा हृदयदावक प्रसंग मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी कथन करताच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले.