मंद्रूप – पवित्र श्रावणमासाचे औचित्य साधून मंद्रूप येथील श्री विठ्ठल राही – रुक्मिणी मंदिरात रविवारी २३ आॅगस्ट रोजी ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ तसेच ‘रुद्र स्वाहाकार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना-भीमा नदीच्या खोऱ्यातील ४० गावांच्या पंचक्रोशीत प्रथमच अभूतपूर्व यज्ञ सोहळा संपन्न होत आहे. श्री तीर्थराज भक्त मंडळ, तीर्थराज युवक मंडळ व तीर्थराज सत्संग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वेदशास्त्राचे अभ्यासक पंडित गौरवाचार्य हुंडेकरी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली हा महायज्ञ संपन्न होणार आहे .
यज्ञाच्या पूर्वतयारीनिमित्त मंद्रूप येथील विठ्ठल मंदिरात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत हुंडेकरी गुरुजींनी यज्ञाचे महत्त्व, वैज्ञानिक व आध्यात्मिक अधिष्ठान तसेच यज्ञाने मिळणारे फलित याविषयी विठ्ठल परिवारातील सदस्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. विश्वकल्याण, पर्यावरण शुद्धी आणि सर्वदूर समाधानकारक पाऊस व्हावा, या उदात्त हेतूने हा महायज्ञ आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळाचे कार्यवाह श्रीधर गंभिरे यांनी दिली.
रविवारी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत हा होम-हवन सोहळा होणार आहे.
या महायज्ञासाठी ६० पेक्षा अधिक दाम्पत्य यजमान म्हणून बसणार आहेत. यज्ञासाठी लागणारे सर्व प्रमुख पूजा साहित्य मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आले असून यजमानांनी सोवळे, पंचा व पूजेची वैयक्तिक भांडी सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त मंद्रूपसह सोलापूर शहर, परिसर आणि कर्नाटक सीमाभागातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत.
पुत्रदा एकादशी व श्रावण पर्वाच्या पार्श्वभूमीवर महायज्ञानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी भगर-आमटी, साबुदाणा खिचडी व मसाला दूध अशा फराळ-महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग देवस्थान समिती, विश्वस्त मंडळ यांच्यासह ग्रामस्थ व विठ्ठल परिवार परिश्रम घेत आहेत.














