सांगोला – सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत नशा मुक्त भारत अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत प्रजापिता ब्रहमकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पंढरपूर या सेवा केंद्राच्या ब्रहमकुमारी स्वाती बेहनजी यांच्या एकदिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी तरुणाई ही कोणत्याही राष्ट्राची ऊर्जा असते. देशाच्या विकासात तरुणांच्या शक्तीचे महत्त्वाचे योगदान असते. तरुणांनी अमली पदार्थांच्या आहारी न जाता राष्ट्राच्या विकासासाठी योगदान द्यावे असे मत यावेळी व्यक्त केले. नशा मुक्त भारत अभियानांतर्गत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना नशा मुक्ततेची शपथ देण्यात आली. तसेच अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो तसेच एनएमबीए ऑनलाईन पोर्टलवर शपथ घेऊन प्रमाणपत्र मिळवले. या कार्यक्रमास संस्था विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, प्रजापिता ब्रहमकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पंढरपूर सेवा केंद्राचे सर्व समाजसेवक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा.एस.पी.जोकार यांनी केले.