सोलापूर – श्रीमद भागवत ग्रंथ व कथाकार पुराणचुडामणी सुदर्शन महाराज बेलगावकर यांची टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेली दिंडी मिरवणूक…..श्री नागनाथ देवस्थानचे खर्गे नागेश स्वामी महाराज यांच्या हस्ते ग्रंथाची पूजा यामुळे श्रीक्षेत्र मार्डीमध्ये भगवान विष्णू व शिवाचे ऐक्य झाल्याचे पहायला मिळाले अन् त्रिशुळावरी काशीपुरी l चक्रावरी पंढरी l दोघे सारखे सारखे l विश्वनाथ विठ्ठल सखे ll या एकनाथ महाराजांच्या अभंगाची प्रचिती उपस्थित श्रोत्यांना याचि देही याची डोळा आली. मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात श्रीक्षेत्र मार्डी येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाला सुरुवात झाली.
श्रावण महिन्यानिमित्त श्रीक्षेत्र मार्डी येथील पेठेतील मारुती मंदिरात शुक्रवारपासून भागवत कथेला सुरुवात झाली. सुरुवातीला रेणुकादेवी मंदिरात कथाकार सुदर्शन महाराज यांचे आद्य देवीभक्त रंगनाथ स्वामी मोकाशी यांचे विद्यमान वंशज ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी यांनी संतपूजन केले. व कथेसाठी ग्रामस्थांच्या वतीने आमंत्रण दिले. धाराशिव येथील श्री संत गजानन महाराज यांचे साधक संतोष दंडवते यांच्या डोक्यावर श्रीमद् भागवत ग्रंथ ठेवला होता. विणेकरी महावीर माळी यांनी पंचपदी घेतली.त्यानंतर टाळमृदंगाच्या गजरात ग्रंथ व महाराजांची दिंडी मिरवणूक काढण्यात आली. सुदर्शन महाराज यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. त्यानंतर खर्गे नागेश स्वामी महाराज,रेणुकादास मोकाशी यांच्या हस्ते ग्रंथ व संत पूजन, उत्तर सोलापूरच्या सभापती तेजस्विनी बोराडे, अमोल बोराडे, रेणुकादास मोकाशी, उपसरपंच श्रीकांत मार्तंडे, वसंत कुलकर्णी, शिवाजी गुरव, महेश मुडके, गजेंद्र साठे यांनी सपत्निक आरती केली.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे यांनीही महाराजांना पुष्पहार अर्पण केला. पहिल्या दिवशी मंगलाचरण, श्रीमद भागवत ग्रंथाचे महात्म्य, गोकर्ण अख्यान व कथा श्रवणविधी या विषयावर सुदर्शन महाराज यांनी चिंतन मांडले.
Post Views: 47