सांगोला – सांगोला शहरात पैगंबर हजरत मोहम्मद (स.) जयंती उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. कुरआन पठण, नात-ए-पाक, इस्लामी प्रवचने तसेच पैगंबरांच्या जीवनकार्यावर आधारित मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध वक्त्यांनी पैगंबर मोहम्मद (स.) यांनी दिलेला शांतता, प्रेम, मानवता आणि बंधुभावाचा संदेश समाजाने आत्मसात करण्याचे आवाहन केले. या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आकर्षक सजविलेले रथ, धार्मिक फलक आणि पारंपरिक वेशभूषेतील युवकांचा सहभाग लक्षवेधी ठरला. मिरवणुकीदरम्यान शांतता, बंधुता आणि देशप्रेमाचे संदेश देणारे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. शहरातील विविध समाजघटकांनी मिरवणुकीचे स्वागत करून पुष्पवृष्टी केली. या पार्श्वभूमीवर सांगोला महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हणमंत बनसोडे यांनी वीजपुरवठा, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी चोख बंदोबस्त तसेच मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम पार पाडले. याप्रसंगी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांसह सर्व धर्मीय नागरिकांनी सहभाग घेत सामाजिक सलोखा, बंधुता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.
चौकट-
सांगोल्यातील शिवप्रेमी मंडळ, आ.डॉ.बाबासाहेब देशमुख मित्रपरिवार, तांबोळी सामाजिक संघटना, साईनाथ गणेश मंडळ, लाबैक ग्रुप, गुलजार मित्रपरिवार, एम.एफ.सी.ग्रुप, नवाज कोल्ड्रिंक मित्रपरिवार यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी रॅलीप्रसंगी खाऊ वाटप केले.