माढा : माढा शहर व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माढा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात वर्गीकरण करावे, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाशजी आबिटकर यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे माढा शहर प्रमुख देविदास खरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
माढा तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र, रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, अद्ययावत वैद्यकीय सुविधा आणि पुरेशा आरोग्यसेवेचा अभाव असल्याने गंभीर रुग्णांना सोलापूर तसेच इतर शहरांमध्ये उपचारासाठी जावे लागते.
या पार्श्वभूमीवर माढा ग्रामीण रुग्णालयाचे तातडीने श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा. तसेच आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय यंत्रसामग्री आणि इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली.
माढा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मागणी महत्त्वाची असून, यासाठी पुढील काळातही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे शिवसेना माढा शहर प्रमुख देविदास (भैय्या) खरात यांनी सांगितले.
Post Views: 30