सांगोला – आपल्या जन्मभूमीची आणि कर्मभूमीची ओढ जपून सामाजिक भान कसे जपावे याचा एक अत्यंत वस्तुनिष्ठ आणि अनुकरणीय वस्तुपाठ सावे (ता.सांगोला) येथील रहिवासी आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कर्मचारी स्व.प्रकाश गावडे यांच्या परिवाराने घालून दिला आहे.
गावडे परिवाराने सांगोला येथील गुळमिरे कॉलनी, महुद रोड येथे एक प्रशस्त बंगला उभारून त्याचे नामाभिधान ‘प्रकाश स्मृती’ असे केले आहे. गृहप्रवेश व वास्तुशांती समारंभ बुधवार दि.२६ ऑगस्ट रोजी आयोजित केला होता. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गावडे परिवाराने पारंपरिक प्रथांना फाटा देत एक नवा पायंडा पाडला. कार्यक्रमात कोणताही आहेर, फेटा, हार-गुच्छ किंवा वैयक्तिक भेटवस्तू न स्वीकारण्याचा अत्यंत आग्रही आणि विवेकवादी निर्णय त्यांनी घेतला. त्याऐवजी, सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब आणि गरजू शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरतील अशा केवळ ‘वह्या’ भेट म्हणून स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी स्नेहीजनांना केले होते. कृपया आहेर, भेटवस्तू शाल, फेटा नको, तर हवी तुमची गरजु विद्यार्थ्यांना साथ….यासाठी शालेय उपयोगी फक्त वह्या स्विकारल्या जातील, असे आवाहन निमंत्रक अलका गावडे, प्रथमेश व दिपाली गावडे, शिवांश व किरण गावडे यांनी निमंत्रण पत्रिकेद्वारे केले होते. त्या प्रमाणे त्यांनी वह्या स्वीकारल्या. एका कौटुंबिक आनंदसोहळ्याला शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची जोड देऊन समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करणे, ही गावडे परिवाराची कृती अत्यंत प्रेरणादायी आहे. गावडे परिवाराच्या या उपक्रमाचे सांगोला शहरासह संपूर्ण सावे परिसरातून जोरदार स्वागत आणि कौतुक होत आहे.
चौकट-
गृहप्रवेशासारख्या वैयक्तिक आनंदाच्या क्षणी वायफळ खर्चाला आणि औपचारिकतेला फाटा देऊन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करणे ही खरी समाजसेवा आहे. गावडे परिवाराने राबवलेला हा वह्या संकलनाचा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय, कौतुकास्पद आणि दिशादर्शक असाच आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा प्रकारच्या उपक्रमांचे अनुकरण करून आपल्या घरातील शुभकार्यांचे रूपांतर सामाजिक उपक्रमांत करावे.
-प्रा.राजेंद्र ठोंबरे, सचिव, चैतन्य हास्य योग मंडळ, सांगोला.