सोलापूर : रक्षाबंधन दिनानिमित्त आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या महिला कार्यकर्त्यांनी सोलापूर एसटी स्टँडवर जाऊन एसटीचे चालक, वाहक, हमाल, प्रवासी तसेच वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांना प्रेमाने राखी बांधून औक्षण केले. अचानक मिळालेल्या या प्रेमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर काहींच्या डोळ्यांत नकळत भावुकता दाटून आली.
एसटीचे अनेक चालक आणि वाहक परगावाहून बस घेऊन सोलापुरात येतात आणि दिवसभर प्रवाशांच्या सेवेत कर्तव्य बजावत असतात. कर्तव्यामुळे त्यांना आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे करता येत नाही. अशाच भावांची उणीव भरून काढत आस्था रोटी बँकेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनगटावर राखी बांधली.
“आज आमच्या बहिणी आमच्यापासून दूर असल्या तरी आस्था रोटी बँकेच्या या भगिनींनी राखी बांधून बहिणीची उणीव जाणवू दिली नाही,” अशा भावना काही चालक-वाहकांनी व्यक्त केल्या. या क्षणी निर्माण झालेला आपुलकीचा संवाद उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.
यावेळी नीलिमा हिरेमठ, छाया गंगणे, स्नेहा मेहता, स्वामी मॅडम यांच्यासह आस्था रोटी बँकेच्या महिला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आस्था रोटी बँकेच्या या अनोख्या उपक्रमाचे एसटी स्टँडमधील अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित प्रवाशांनी मनापासून कौतुक केले. काही क्षणांसाठी एसटी स्टँडवरील धावपळ थांबली आणि वातावरणात सख्ख्या बहिण-भावाच्या नात्याचीच जणू ऊब पसरली.



















