सोलापूर : बापूजी नगर परिसरातील सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीचे समाजमंदिर धार्मिक कार्यासाठी वापरून त्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीनंतर महापालिकेने बुधवारी सायंकाळी कारवाई करीत संबंधित इमारत ताब्यात घेतली. ‘जीझस गॉस्पेल सोसायटी’ला २४ तासांत समाजमंदिराचा ताबा सोडण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, मुदतीत ताबा न दिल्याने भूमी व मालमत्ता विभाग आणि अतिक्रमणविरोधी पथकाने इमारत सील करून महापालिकेच्या ताब्यात घेतली आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली.
हिंदू जनजागृती समितीने ३० जून २०२६ रोजी बापूजी नगर येथील समाजमंदिराचा बेकायदेशीरपणे चर्चसाठी वापर होत असल्याची तसेच धार्मिक तेढ निर्माण होत असल्याची तक्रार महापालिकेकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने उपलब्ध कागदपत्रे, नस्ती आणि तक्रारदारांची सुनावणी घेण्यात आली. जून व जुलै महिन्यात झालेल्या चौकशीनंतर अतिरिक्त आयुक्त तथा भूमी व मालमत्ता विभागाच्या नियंत्रण अधिकारी वीणा पवार यांनी २७ जुलै रोजी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे अहवाल सादर केला.
या अहवालात समाजमंदिराचा वापर सामाजिक कार्याव्यतिरिक्त धार्मिक कार्यासाठी होत असल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर भूमी व मालमत्ता विभागाने ७ ऑगस्ट रोजी ‘जीझस गॉस्पेल सोसायटी’ला नोटीस बजावून त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. संस्थेच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी खुलासा सादर करण्यात आला. मात्र, या खुलाशास आवश्यक आणि योग्य पुरावे जोडलेले नसल्याने तो अमान्य करण्यात आला.
याबाबत २५ ऑगस्ट रोजी आयुक्तांसमवेत चर्चा करण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने ३१ ऑगस्ट रोजी समाजमंदिर तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले. त्या अनुषंगाने संस्थेचे सचिव राजू आशीर्वाद जंगम यांना २ सप्टेंबर रोजी २४ तासांची नोटीस बजावण्यात आली होती.
मुदतीत संस्थेकडून समाजमंदिराचा ताबा देण्यात न आल्याने बुधवारी दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.२५ वाजता भूमी व मालमत्ता विभागाचे पथक, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. समाजमंदिर सील करून ते महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार या उपस्थित होत्या. तसेच महापालिकेचे पथक उपस्थित होते.
दरम्यान, हे समाजमंदिर पूर्वी एकमजली होते. त्यानंतर तत्कालीन आमदार यांच्या निधीतून दुसरा मजला बांधण्यात आला होता. इमारतीचे क्षेत्रफळ सुमारे ४९.९५ चौरस मीटर आहे. २००७ पासून विविध टप्प्यांत करार व मुदतवाढ देऊन ‘जीझस गॉस्पेल सोसायटी’ला समाजमंदिर वापरासाठी देण्यात आले होते. २०१७ नंतर कराराची मुदत संपली असली तरी संस्थेकडून वापर सुरू होता आणि त्यासाठी भाडे आकारले जात होते.
परस्पर सील तोडून इमारत उघडण्याचा
प्रयत्न झाल्यास फौजदारी कारवाई
महापालिकेने समाजमंदिराच्या ठिकाणी नोटीस लावून कोणालाही इमारतीचा वापर अथवा गैरवापर करू नये, असे स्पष्ट केले आहे. परस्पर सील तोडून इमारत उघडण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी स्पष्ट केले आहे.
Post Views: 13