पंढरपूर – येत्या ९ सप्टेंबर रोजी पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजिण्यात आलेली आहे. या सभेच्या विषय पत्रिकेवर एकुण २८ विषय ठेवण्यात आलेले आहे. या मध्ये सर्वात महत्वाच्या विषय म्हणजे प्रस्तावित कॉरिडॉरसाठी भूसंपादन करण्याबाबतच्या ठरावाचा विषय होय. त्यामुळे सभेतील या विषया बाबत नगराध्यक्षांसह त्यांच्या पाठीमागे असलेल्या नगरसेवकांची तसेच सत्ताधारी नगरसेवक मंडळींची नेमकी भूमिका काय राहणार ? याकडे सर्वसामान्य पंढरपूरकरांचे विशेषत: शेकडो कॉरिडॉर बाधितांचे लक्ष लागले आहे. या शिवाय अतिक्रमणे,पार्किंग आदी विषयांवर देखील नगरसेवकांची भूमिका काय असणार आहे हे देखील या वेळी स्पष्ट होणार आहे.
पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार, ९ सप्टेंबर रोजी नगरपालिकेच्या छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत तब्बल २८ विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. या मध्ये येथील मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरसाठी भूसंपादन करण्याबाबतचा ठराव हा या सभेतील सर्वाधिक महत्त्वाचा विषय मानला जात आहे. भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने मंदिर परिसरात कॉरिडॉर प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या सभेत या विषयावर नगराध्यक्षांसह, सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान पालिका निवडणूकीत कॉरिडॉर विषयाचे भांडवल करुन नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह अनेक नगरसेवकांनी संभाव्य कॉरिडॉर बाधितांची सहानुभूती मिळविली होती. दस्तुरखुद्द नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालकेंनी देखील कॉरिडॉरला विरोध दर्शवुन मोठ्या फरकांनी पालिका निवडणूकीत विजय मिळविला होता. पालिका निवडणूकीच्या वेळी डाँ.भालके या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या होत्या. कॉरिडॉर होवू देणार नाही असे ठामपणे सांगून त्यांनी बाधित मंडळींची सहानुभूती मिळविली होती. मात्र त्यावेळची आणि सध्याची एकंदर परिस्थिती वेगळी आहे. कारण मध्यंतरीच त्यांनी व त्यांच्या पाठीशी असलेल्या समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेत ( एकनाथ शिंदे गटात) प्रवेश केलेला आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष सध्या राज्यातील सत्तेत एकत्रित नांदत आहेत. त्यामुळे दस्तुरखुद्द नगराध्यक्षांनीच आणि त्यांच्या मागे असलेल्या नगरसेवकांनी जर या विषयाला विरोध दर्शविला तर सत्तेतील शिवसेना पक्ष तोंडावर पडणार आहे. याचे दूरोगामी परिणाम राज्यातील युतीच्या सत्तेवर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगराध्यक्षा आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांची या विषयावर काय भूमिका असेल या बद्दल सर्वांना उत्सुकता आहे.
या शिवाय नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर तसेच शहरातील विविध ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांचा विषयही सभेच्या अजेंड्यावर आहे. अतिक्रमणे काढून त्या ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतूक, स्वच्छता आणि सार्वजनिक जागांच्या वापराचा प्रश्न निर्माण होत असल्याने नगरपालिका प्रशासन अतिक्रमणांबाबत कोणती भूमिका घेते, याकडेही नागरिकांचे लक्ष राहणार आहे.
दरम्यान, पार्किंग आणि आरोग्यकर वसुलीच्या ठेक्याचा विषय पुन्हा एकदा नगरपालिकेच्या सभेत येत आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी हा ठेका देण्यात आला होता. मात्र, भाविकांकडून व नागरिकांकडून वाद निर्माण झाल्यानंतर तसेच या विषयासंदर्भातील बाबी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर संबंधित ठेका रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा पार्किंगचा ठेका काढण्याबाबत ठराव सभेत मांडण्यात येणार असल्याने या विषयावर नगरसेवकांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. पार्किंग ठेका पुन्हा देण्याच्या निर्णयामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे या चर्चांना सभेत कोणते स्वरूप मिळते आणि नगरपालिकेकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
———————————
चौकट : ( डिजिटल फलकांसाठी जागा निश्चित करण्याचा विषय )
शहरातील विविध भागांमध्ये डिजिटल जाहिरात फलक लावण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल फलकांसाठी निश्चित जागा ठरविणे आणि त्यासाठी ठेका देण्याबाबतचा विषयही सभेत चर्चेला येणार आहे. यामुळे शहराचे विद्रूपीकरण रोखण्याबरोबरच जाहिरात फलकांमधून नगरपालिकेला उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीने धोरण निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.
———————————
चौकट : ( सभेतील विषयांच्या भाऊगर्दीमुळे सर्वसाधारण सभेकडे लक्ष )
कॉरिडॉरसाठी भूसंपादन, अतिक्रमण हटविणे, अतिक्रमणाच्या ठिकाणी संरक्षक भिंती, पार्किंग ठेका, आरोग्यकर वसुली आणि डिजिटल जाहिरात फलकांसह एकूण २८ विषय सभेच्या विषयपत्रिकेवर आहेत. त्यामुळे ९ सप्टेंबर रोजी होणारी पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा अनेक अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे.
Post Views: 9