पंढरपूर – राज्य शासनाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला गोशाळा आधुनिक करण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीतील सुमारे तीन हेक्टर जमीन दिल्याच्या मुद्द्यावरून पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या जमिनीच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलवावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक वासुदेव बडवे यांनी केली. मात्र, हा विषय सभेच्या विषयपत्रिकेवर नसल्याचे सांगत नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांनी सभागृहात चर्चा करण्यास नकार दिल्याने वातावरण चांगलेच तापले. अखेर भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा छत्रपती सभागृहात नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक गोशाळेसाठी मंदिर समितीला देण्यात आलेल्या जमिनीचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला.
————————
चौकट : ( विशेष सभा घेण्याची मागणी )
गोशाळेसाठी जमीन देण्यात आल्याच्या निर्णयाबाबत यापूर्वीच नगराध्यक्षांना विशेष सभा घेण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप विशेष सभा घेण्यात आलेली नसल्याने ही सभा कधी बोलावणार, असा सवाल काही सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला.
——————-
चौकट : ( पालिका हद्दीतील जमीनीचा विषय असल्याने महत्वाचा )
भाजपचे नगरसेवक वासुदेव बडवे यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडत संबंधित जमिनीबाबत नगरपालिकेच्या सभागृहात सविस्तर चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. नगरपालिकेच्या हद्दीतील महत्त्वाच्या जमिनीबाबत शासनस्तरावर निर्णय घेताना नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी आणि नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
—————-
चौकट : ( विषयपत्रिकेवर नसल्याने चर्चा नाकारली )
सभे मध्ये नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांनी हा विषय आज होत असलेल्या सभेच्या विषयपत्रिकेवर नसल्याने त्यावर सभागृहात चर्चा करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला. दरम्यान महत्त्वाचा सार्वजनिक आणि नगरपालिकेशी संबंधित विषय नगरसेवकांनी उपस्थित केला असताना केवळ तो विषयपत्रिकेवर नसल्याचे कारण देऊन चर्चा रोखणे योग्य नसल्याचा दावा भाजप नगरसेवकांनी केला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.
——————-
चौकट : ( आरोप-प्रत्यारोपानंतर सभात्याग )
जमिनीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. काही काळ सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले. वाढता गोंधळ पाहता अखेर भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही काळ सभा थांबविण्यात आली. सुमारे पंधरा मिनिटांनंतर पुन्हा सभा सुरू करण्यात आली.
——————–
चौकट : ( सत्ताधारी नगरसेवकांकडून प्रश्नांची सरबत्ती )
गोशाळा आधुनिक करण्यासाठी मंदिर समितीला देण्यात आलेल्या सुमारे तीन हेक्टर जमिनीचा मुद्दा आता पंढरपूरच्या नगरपालिका राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. ही जमीन कोणत्या प्रक्रियेतून देण्यात आली. या निर्णयापूर्वी नगरपालिकेला विश्वासात घेण्यात आले होते का, जमिनीचा नेमका वापर कसा केला जाणार आणि भविष्यात त्याचा नगरपालिकेवर काय परिणाम होणार, याबाबत नगरसेवकांकडून पालिका आधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
———————-
चौकट – ( भाजपा नगरसेवकांकडून स्पष्टीकरण )
ज्यावेळी पालिकेत गोशाळेच्या जागेच्या विषयावर ज्यावेळी चर्चा सुरु झाली त्यावेळी काही विरोधी नगरसेवकांकडून भाजपाचे नगरसेवक असून तुम्ही गोशाळेला विरोध करता अशी टिप्पणी केली गेली. त्यावर भाजपाचे नगरसेवक भागवत बडवे यांनी आमचा गोशाळेला विरोध नाही. आम्ही हिंदूत्ववादी लोक आहोत, गोमाता सर्वांचेच दैवत आहे. त्यामुळे कृपया काही तरी गैरसमज करुन घेऊ नका, कारण आमचा गोशाळेला विरोध नाही. गोशाळेसाठी मंदिर समितीला दिलेल्या नगरपालिका हद्दीतील शासनाच्या जागेबद्दल आमचा आक्षेप असल्याचे स्पष्ट केले.
——————-
चौकट : ( नगराध्यक्षांच्या भूमिकेकडे लक्ष )
गोशाळेसाठी देण्यात आलेल्या जमिनीच्या मुद्द्यावरून आजच्या सभेत झालेल्या गोंधळामुळे पंढरपूर नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे. विशेष सभेच्या मागणीवर नगराध्यक्षांकडून पुढील काळात कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 27