मोडनिंब – गणेशोत्सव व गौरी पूजनाचा सण सुरू असतानाच मोडनिंब (ता. माढा) शहराचा पाणीपुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद असल्याने नागरिकांवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. शहरातील प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, ऐन सणासुदीच्या काळातही महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.अनेक भागांत नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काही प्रभागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना सामायिक वा खासगी टँकर, बोअरवेल किंवा उपलब्ध इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे.सणासुदीच्या काळात पाण्याची गरज वाढलेली असताना पाणी उपलब्ध होत नसल्याने महिलांसह नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. परिसरातील नागरिकांच्या पाणीप्रश्नाकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. मोटार बिघाड, स्टार्टर, मोटार पंप जळणे तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ दुरुस्तीपुरतेच प्रयत्न होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
प्रभाग क्रमांक २ मध्येही पाण्यासाठी पायपीट
शहरातील अन्य भागासह प्रभाग क्रमांक २ मध्येही गेल्या आठवडाभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे. सार्वजनिक बोअरही नादुरुस्त असल्याने नागरिकांची पाण्यासाठी मोठी कोंडी झाली आहे. ऐन गणेशोत्सव व गौरी पूजनाच्या काळात पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असताना नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाकडे प्रभागातील संबंधित सदस्यांचे कितपत लक्ष आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.