बार्शी – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी बँक) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यालयात विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार व राजकीय समीकरणांबाबत नव्याने चर्चा रंगू लागल्या आहेत.
अलीकडेच आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतल्यानंतर बार्शीतील त्यांच्या कार्यालयात जिल्हाभरातील अनेक राजकीय नेत्यांनी सदिच्छा भेटी देण्यास सुरुवात केली आहे. या भेटींमध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी आमदार राजन पाटील यांनीही राऊत यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी डीसीसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
याशिवाय करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण (आबा) पाटील, युवा नेते पृथ्वीराज पाटील, माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. मीनल दादासाहेब साठे, कुर्मीदास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादासाहेब साठे, करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, तसेच मंगळवेढ्यातील ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांनीही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आमदार राऊत यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान जिल्ह्यातील विकासकामे, सहकार क्षेत्रातील घडामोडी, आगामी डीसीसी बँक निवडणूक तसेच बदलती राजकीय समीकरणे यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली. या बैठकीस माजी नगरसेवक अरुणदादा बारबोले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शीत वाढलेल्या या राजकीय भेटीगाठींमुळे आगामी काळातील सहकार आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 15