बार्शी – बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्याचा ठपका असलेल्या दोघांविरुद्ध विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियमांतर्गत (एमपीडीए कायद्यान्वये) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी १७ सप्टेंबर रोजी याबाबतचा आदेश काढला आहे.
संजय विलास आरगडे, सतीश श्रीमंत आरगडे (दोघे रा. तावडी, ता. बार्शी) यांनी आपल्या साथीदारांसह बार्शी शहर
पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न, मालमत्ता जबरदस्तीने हिसकावून घेण्याच्या उद्देशाने दुखापत करणे, घातक हत्याराचा वापर करुन इच्छापूर्वक दुखापत करणे, महिलेचा विनयभंग करणे, अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करणे तसेच शिवीगाळ, दमदाटी करुन ठार मारण्याची धमकी देणे अशा स्वरुपाचे गुन्हे केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संजय आरगडे व सतीश आरगडे यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी एमपीडीए अन्वये स्थानबद्धतेचा आदेश पारित केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, बार्शी शहर पोलिसांनी शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी संजय विलास आरगडे व सतीश श्रीमंत आरगडे यांची रवानगी पुणे येथील येरवडा कारागृहात केली आहे.
Post Views: 28