सोलापूर – गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत सापडलेल्या मंद्रूप आणि परिसरातील बळीराजाला उत्तरा नक्षत्राच्या पावसामुळे अखेर दिलासा मिळाला आहे. सोमवारी सायंकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे करपून जाण्याच्या मार्गावर असलेल्या खरीप पिकांना नवीन जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यावर्षी मान्सूनच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पंधरवड्यापर्यंत पावसाने पूर्णपणे ओढ दिली. कडक ऊन आणि पाण्याच्या कमतरतेमुळे उडीद, मूग, सोयाबीन, तुर ,भुईमूग, बाजरी मका आणि पिकांची वाढ खुंटली होती. काही ठिकाणी पिके करपू लागल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते.
अखेर दोन महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मंद्रूप आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह रिमझिम पावसाची संततधार सुरू झाली. या संततधारेमुळे शेतातील पिकांना मोठा आधार मिळाला आहे. जमिनीतील ओलावा वाढल्याने पिकांमधील सुकवा दूर होण्यास मदत होणार आहे.




















