अक्कलकोट – अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
येथील कल्याणशेट्टी हायस्कूल मध्ये आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीपर्यंत रंगलेल्या सामन्यांमध्ये आफ्रीन तन्वीर अत्तार आणि प्रसन्न शिवानंद मंगुळे यांनी आपल्या बुद्धिचातुर्याचा, संयमाचा आणि उत्कृष्ट खेळकौशल्याचा प्रभावी प्रत्यय देत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे दोन्ही खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा. सोहेल शेख, जिमखाना विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय बिराजदार, सुधीर राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणे, व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक नीलप्पा भरमशेट्टी, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आफ्रीन अत्तार व प्रसन्न मंगुळे यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कोट :
बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून संयम, नियोजन आणि निर्णयक्षमतेची कसोटी घेणारा खेळ आहे. विद्यार्थ्यांनी या गुणांचा प्रभावी वापर करून मिळवलेले यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.
– बसलिंगप्पा खेडगी
-चेअरमन
Post Views: 18