बार्शी – शिवछत्रपती व्यायाम शाळा, पाटील चाळ तरुण गणेश मंडळ संचलित लंबोदर प्रतिष्ठानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘महिला आरती व मनोरंजक खेळ सोहळा’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
तुळजापूर रोड, पाटील चाळ येथील हनुमान मंदिर परिसरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात महाआरतीने झाली. त्यानंतर महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत खेळांचा मनमुराद आनंद लुटला.
यावेळी लहान मुला-मुलींनी सादर केलेल्या बहारदार नृत्यांनी कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. बालचमूंच्या कलागुणांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरुन दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संज्योती थोरात यांनी केले. त्यांच्या ओघवत्या शैलीतील सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मनोरंजक खेळ स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक सुप्रिया पवार यांनी पटकावला असून त्यांना सोन्याची नथ बक्षीस देण्यात आली. द्वितीय क्रमांक नीता साखरे यांनी मिळवला असून त्यांना पैठणी साडी, तर तृतीय क्रमांक शिवानी पवार यांनी मिळवला असून त्यांना ब्युटी हॅम्पर देण्यात आला.
स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला लंबोदर प्रतिष्ठानच्यावतीने सन्मानपूर्वक भेटवस्तू देण्यात आली. महिलांमधील स्नेहबंध अधिक दृढ व्हावेत, तसेच गणेशोत्सवाच्यानिमित्ताने सर्व महिलांना एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शोभना क्षीरसागर, निशा जाधव, भारती थोरात, रेणुका क्षीरसागर, सुवर्णा कदम, राणी गुढे, शलाका थोरात यांच्यासह मंडळातील इतर महिलांनी विशेष परिश्रम घेतले. लंबोदर प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या आगळ्यावेगळ्या महिला केंद्रित उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात आले.
Post Views: 18