माढा : रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथील हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवस उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला. हिंदी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध साहित्यिक परंपरा तसेच आधुनिक काळातील हिंदी भाषेची उपयुक्तता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. घनश्याम हराळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून के. एन. भिसे महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनीषा साळुंखे व सुलताना शिकलकर या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून हिंदी दिवस साजरा करण्यामागील ऐतिहासिक व भाषिक पार्श्वभूमी स्पष्ट करण्यात आली.
प्रमुख पाहुणे डॉ. मनीषा साळुंखे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात हिंदी ही केवळ संवादाची भाषा नसून भारतीय साहित्य, संस्कृती आणि विविधतेला जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा असल्याचे प्रतिपादन केले. तर डॉ. सुलताना शिकलकर यांनी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचा प्रभावी वापर करून आपल्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. घनश्याम हराळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये भाषेचे महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी हिंदी भाषण, निबंध लेखन, कविता वाचन, इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हिंदी भाषेविषयीची आपली आवड व अभिरुची व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नियोजन हिंदी विभागाचे डॉ. अलका घोडके प्रा. चतुर्भुज गिड्डे, प्रा. अमोल मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सानिका विद्यागज व जुलेखा तांबोळी यांनी केले, डॉ. अलका घोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post Views: 53