सोलापूर : सोलापूर महानगरपालिका इमारतीत नागरिकांची मोठी वर्दळ असते. विविध कामांसाठी नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कर्मचारी दररोज महापालिकेत ये-जा करतात. या पार्श्वभूमीवर महापालिका इमारतीची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सुरक्षा यंत्रणा व उपाययोजना करण्याची मागणी कामगार व समाजकल्याण समितीच्या सभापती श्रद्धा पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका इमारतीमध्ये नागरिक व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे. इमारतीच्या प्रवेशद्वारावर तसेच आवश्यक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.महापालिका परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच नागरिक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. यासाठी सुरक्षा व्यवस्था, तपासणी यंत्रणा तसेच आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही देखरेख सक्षम करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी अपेक्षा नगरसेविका श्रद्धा पवार यांनी व्यक्त केली आहे.
Post Views: 14