बार्शी – लग्नासाठी स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमानंतर बार्शीतील २४ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मोबाइल बंद असल्याने तसेच बार्शी व पुणे परिसरात शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा न लागल्याने, अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करीत तिच्या भावाने बार्शी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, भाऊ हा धाराशिव येथे नोकरी करत आहे. त्यांची आई आणि बहीण असे कुटुंब आहे. बहीण ही गेल्या दीड वर्षापासून पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास होती. बहिणीस लग्नासाठी स्थळ पाहण्याच्या उद्देशाने तिला बार्शी येथील घरी बोलावण्यात आले होते. गणपती व गौरी सणानिमित्त तिने आठवडाभराची सुट्टी घेतली होती. त्यानुसार ती १३ सप्टेंबर रोजी सकाळी बार्शी येथे आली. त्याच दिवशी दुपारी तिच्या लग्नाबाबत स्थळ पाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर कुटुंबीयांमध्ये स्थळाबाबत चर्चा झाली. त्यावेळी बहीण काहीशी नाराज दिसत होती आणि ‘माझा निर्णय तुम्हाला नंतर सांगते,’ असे तिने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बहीण कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. तिच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल बंद असल्याचे आढळून आले. यानंतर कुटुंबीयांनी बार्शी शहर व परिसरात तसेच नातेवाइकांकडे तिचा शोध घेतला. तसेच पुणे येथे ती नोकरी करीत असलेल्या कंपनीमध्ये आणि ती राहत असलेल्या ठिकाणीही चौकशी करुन शोध घेण्यात आला. मात्र, तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फूस लावून बहिणीचे अपहरण केले असल्याचा संशय असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध भावाने फिर्याद दिली आहे. तपास पोलिसांकडून सुरु आहे.