सोलापूर – ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील तब्बल ३५ आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (एन क्यू ए एस) प्राप्त झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता, रुग्णसुरक्षा, व्यवस्थापन आणि रुग्णकेंद्रित सेवांना अधिक बळ मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य संस्थांच्या सेवा व सुविधांचे विविध निकषांवर मूल्यांकन केले जाते. यामध्ये आरोग्य सेवेची गुणवत्ता, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, औषधोपचार, मनुष्यबळ, व्यवस्थापन तसेच सेवा वितरणाची कार्यक्षमता तपासली जाते. या निकषांची पूर्तता करणाऱ्या संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन अर्थात एन क्यू ए एस प्रमाणपत्र दिले जाते.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर, मुस्ती यांनी हे राष्ट्रीय मानांकन यशस्वीपणे प्राप्त करून जिल्ह्यातील पहिले एन क्यू ए एस प्रमाणित आयुष्मान आरोग्य मंदिर होण्याचा मान मिळवला आहे. यामुळे जिल्ह्यातील अन्य आरोग्य संस्थांसाठीही गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा एक आदर्श निर्माण झाला आहे.
दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर, मुंढेवाडी हे प्रत्यक्ष मूल्यांकनासाठी पात्र ठरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य संस्थांच्या गुणवत्तावाढीच्या प्रक्रियेला आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
चौकट
मानांकनामुळे निधी आणि सुविधांना बळ
एन. क्यू ए एस मानांकन मिळालेल्या आरोग्य संस्थांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गुणवत्ता प्रोत्साहन निधी मिळण्यास पात्रता प्राप्त होते. या निधीच्या माध्यमातून आरोग्य केंद्रांची पायाभूत सुविधा, वैद्यकीय उपकरणे, रुग्णांसाठी आवश्यक सुविधा आणि सेवा अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे.
चौकट
गावातच मिळणार गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा
जिल्ह्यातील ३५ आरोग्य मंदिरांना मिळालेले राष्ट्रीय मानांकन हे केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित न राहता त्याचा थेट फायदा ग्रामीण नागरिकांना होणे अपेक्षित आहे. प्राथमिक पातळीवरच अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि रुग्णकेंद्रित सेवा उपलब्ध झाल्यास किरकोळ आजारांसाठी नागरिकांना मोठ्या रुग्णालयांकडे धाव घेण्याची गरज कमी होऊ शकते. त्यामुळे ‘गावाजवळ आरोग्यसेवा आणि गुणवत्तेत राष्ट्रीय मानक’ हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे.